प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा   

नव्या चेहर्‍याला संधी द्या : जयंत पाटील

पुणे : पक्षाने मला सात वर्षे प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली. त्यामुळे आता तरुण चेहर्‍याला संधी द्या, अशी मागणी पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिन सोहळ्यात जयंत पाटील यांनी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊ नका, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावर राजीनाम्याची घाई करु नका, कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेत हा निर्णय आपण सर्वानुमते घेऊ, अशी भूमिका पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन पक्षांत विभाजन झाले. त्यानंतर, शरद पवार आणि अजित पवार यांच्या वतीने काल पुण्यात दोन वर्धापनदिन सोहळे साजरे करण्यात आले. यानिमित्ताने दोन्ही पक्षांच्यावतीने शक्तीप्रदर्शन पाहावयास मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात झाला. यावेळी जयंत पाटील यांनी कंठ दाटून आलेल्या स्वरात मागणी केली की, मला पक्षाने सात वर्षे प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली. आता मला या जबाबदारीतून मुक्त करावे. नव्या चेहर्‍याला संधी द्या. यावर सभागृहात कार्यकर्ते जागेवर उभे राहून राजीनामा देऊ नका साहेब; तुम्हीच या पदावर राहा, असे ओरडून सांगू लागले. त्या वेळी पुन्हा जयंत पाटील कार्यकर्त्यांना म्हणाले, पक्ष शरद पवार यांचा आहे. त्यांना निर्णय घेऊ द्या. तो मला मान्य राहील. त्यांनतर कार्यकर्ते शांत झाले.

घाई नको, सर्वानुमते निर्णय : शरद पवार

वर्धापन मेळाव्यात सर्वात शेवटी अध्यक्ष शरद पवार भाषणासाठी उभे राहिले. त्यांंनी जयंत पाटील यांच्या मागणीचा उल्लेख सुरुवातीलाच केला. ते म्हणाले, कार्यकर्त्यांची भावना मला दिसली. तुम्ही पद सोडू नये, अशी त्यांची मागणी दिसते आहे. त्यामुळे घाईने निर्णय घेऊ नको; हा निर्णय आपण सर्वानुमते घेऊ.

आमच्या पक्षात लोकशाही : सुप्रिया

आपल्या पक्षात लोकशाही आहे. सर्व खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल. आपण लोकशाही मार्गाने हा निर्णय घेऊ. आजचा हा कौटुंबिक सोहळा आहे. हा शक्तीप्रदर्शनाचा नाही, असा टोला यावेळी अजित पवार यांना लगावला.
 

Related Articles